Thursday, June 26, 2008

शब्दबंध २००८ - व्यक्त होती ब्लॉगकार


"शब्दबंध" ही मराठी ब्लॉगकारांची ई-सभा नुकतीच पार पडली. आपापल्या ब्लॉगमधील व आपल्याला आवडलेल्या ब्लॉगांमधील निवडक पोस्टांचं अभिवाचन व ब्लॉगकारांशी गप्पा अशा स्वरूपाची ही सभा होती. त्यात अमेरिकेतून आठ, जपानमधून एक व ऑस्ट्रेलियातून एक, असे एकूण दहा ब्लॉगकार सहभागी झाले होते. "स्काईप"च्या मेसेंजरवर ही ई-सभा पॅसिफ़िक (दिवाप्रकाशबचत) प्रमाणवेळेनुसार शनिवारी दि. ७ जून २००८ रोजी दुपारी ४:३० च्या सुमारास सुरू झाली. तीन देश (अमेरिका, जपान ऑस्ट्रेलिया), पाच प्रमाणवेळा (पूर्व अमेरिका, मध्य अमेरिका, पॅसिफ़िक, मेलबर्न-ऑस्ट्रेलिया व जपान) व दहा सदस्य या बाबींमुळे "शब्दबंध"चे सर्व सदस्य या सभेबद्दल उत्सुक होते. ही सभा यशस्वी होण्यात अप्रत्यक्षपणे सहकार्य केल्याबद्दल http://www.gmail.com/, http://www.blogger.com/, http://www.skype.com/http://www.pamela-systems.com/ या सर्वांच्या टीम्सचे मनापासून आभार. अगदी अनौपचारिक पद्धतीने ही सभा पार पडल्यामुळे तिची माहिती देतानादेखील औपचारिकपणा नसावा असं "शब्दबंध"च्या सदस्यांना वाटलं. म्हणूनच, "वृत्तांत" अशी औपचारिक संज्ञा इथे वापरणं उचित वाटतं नाही. तर "शब्दबंध" सभा कशी झाली, त्यात कोणाकोणाला काय काय अनुभव आलेत हे "शब्दबंध"च्या सदस्यांकडूनच जाणून घेऊ.


प्रशांत मनोहर (लॉस ऍन्जेलिस, कॅलिफ़ोर्निया, अमेरिका)
ब्लॉगलेखन व ब्लॉगवाचन करता करता, प्रतिक्रियांच्या देवाणघेवाणीतून काहीतरी नवीन मिळत गेलं व परिणामतः लेखनशैली बदलत गेली, अधिक प्रगल्भ होत गेली. अशा ब्लॉगकारांशी गप्पा कराव्यात व त्यांचं लेखन त्यांच्याकडूनच ऐकावं हा विचार एकदा सहज मनांत आला. साहित्य संमेलनात ज्याप्रमाणे साहित्यिक अभिवाचन करतात, तसंच ब्लॉगकारांनी ई-साहित्यसंमेलन भरवावं अशी कल्पना होती. पण कशी सुरवात करावी हा प्रश्न होता. ब्लॉगवरील प्रतिक्रियांद्वारे परिचित झालेले संगीता व नीलेश आणि ऑर्कुटवर परिचित झालेली सुमेधा यांना प्रथम हा विचार विरोपाद्वारे सांगितला व या तिघांनीही तो उचलून धरला. माझं ब्लॉगलेखन पाहता, "ब्लॉगकारांचं ई-साहित्य-संमेलन" हा शब्द फारच मोठा वाटत होता. पण दुसरा पर्यायी शब्द सापडेपर्यंततरी तोच शब्द वापरणं आवश्यक होतं. मग, संमेलन या शब्दाला शोभेल अशी सदस्यसंख्या तरी असायला हवी व पहिलाच प्रयोग असल्यामुळॆ तांत्रिक अडचणींचा विचार करता ती संख्या फार मोठीही नको, या विचारातून साधारणपणे दहा सदस्य असावेत असं ठरवण्यात आलं. सदस्यशोध करताना आमचे वैयक्तिक परिचय, ऑर्कुटची मराठी ब्लॉगर्स कम्युनिटी, इत्यादिंच्या आधारे नंदन, चक्रपाणि, प्रिया, गायत्री, सई यांना ही कल्पना दिली व अत्यंत उत्साहाने ही सर्व मंडळी तयार झालीत. मग विरोपाच्या देवाणघेवाणीतून "ई-साहित्य संमेलना"ऐवजी "ई-सभा" हे सुटसुटीत नाव पुढे आलं, या ई-सभेसाठी नंदनने "शब्दबंध" हे नाव सुचवलं व सर्वांनी त्याला अनुमोदन दिलं. नंतर एक-दोनवेळा चाचणी घेतल्यानंतर ई-सभेसाठी स्काईपचं मेसेंजर सर्वांना सोयीस्कर वाटलं. "पामेला फ़ॉर स्काईप" या फ़्रीवेअरच्या आधारे ऑडिओ रेकॉर्डिंग करण्याचंही ठरलं. या सदस्यांमधलं भौगोलिक अंतर, वेगवेगळ्या प्रमाणवेळा यांचा विचार करता सर्वांना अगदी सोयीस्कर असलेली वेळ मिळणं अवघड होतं. पण सुदैवानं त्यातल्या त्यात सोयीची वेळ निवडण्यात यश आलं आणि पॅसिफ़िक (दिवाप्रकाशबचत) प्रमाणवेळेनुसार ७ जून २००८ रोजी दुपारी ४ वाजता (मध्य व पूर्व अमेरिकन वेळांनुसार अनुक्रमे सायं ६ व ७ वाजता, जपानच्या व ऑस्ट्रेलिया(मेलबर्न)च्या वेळांनुसार ८ जून रोजी अनुक्रमे सकाळी ८ व ९ वाजता) "शब्दबंध"ची सभा भरवण्याचं ठरलं. दरम्यानच्या काळात, आशाताई (आशा जोगळेकर) अमेरिकेत आल्या असल्याचं कळलं, व त्यांना निमंत्रण दिल्यावर त्यांनीही अत्यंत उत्साहाने सहभागी होण्याचं आश्वासन दिलं. अशाप्रकारे "शब्दबंध"चे दहा सदस्य पक्के झालेत.

ठरलेल्या वेळी सभा सुरू झाली तेव्हा सुरवातीला बँडविड्थ व रेकॉर्डिंगच्या संदर्भात तांत्रिक अडचणी आल्यात पण नंतर रेकॉर्डिंगचा विचार बाजूला ठेवल्यावर सूर जुळले. अर्थात, त्यानंतरही काही सदस्यांना बरेच कष्ट घ्यावे लागलेत. विशेषतः प्रियाला इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या अडचणी आल्यात तेव्हा तिने अधून मधून मोबाईल फ़ोनवरून सुमेधाला संपर्क साधला व तिच्या लॅपटॉपवरून अभिवाचन ऐकलं. तसंच, संगीताला ऐकण्यासाठी एक व बोलण्यासाठी एक कंप्युटर अशी व्यवस्था करावी लागली. तरीसुद्धा सलग चार-साडेचार तास ई-सभा अखंडपणे चालली. सभेची आखणी करताना साधारणतः तास-दीड तासाच्या अंतरावर ५-१० मिनिटं विश्रांती घ्यावी असं ठरलं होतं, पण सर्वांचा उत्साह पाहता तसं काही करण्याची गरज भासली नाही. ब्लॉगवाचनातले पूर्वी आवडलेले लेख-कविता, त्या त्या ब्लॉगकाराच्या तोंडून ऐकण्याचा अनुभव पूर्वी केलेल्या कल्पनेहून कितीतरी पटीने आनंददायक होता. त्यात, त्या त्या लेखनामागचा संदर्भ मिळाल्यावर फारच छान वाटलं. सुमेधाने "त्रिवेणीची वेणी" सादर केल्यानंतर त्रिवेणी व हायकू या काव्यप्रकारांबद्दल झालेल्या चर्चेत ज्ञानाची भर पडली. आशाताईंनी "ऋतू" ही कविता सादर करून ई-सभेचं वातावरण प्रफुल्लित केलं. कविवर्य बा. सी. मर्ढेकरांच्या "या गंगेमधि गगन वितळले" या कवितेवरील नंदनचं विवेचन अप्रतीम होतं. गायत्रीने खास "गायत्रीशैली"तलं "म्हाराश्ट्र दीन"चं अभिवाचन करून महाराष्ट्र दिन सोहळ्याचं चित्र उभं केलं; तर नीलेशने "भारत अधुन मधुन माझा देश आहे" व "पुन्हा मी" यांतून वास्तवातलं चित्र सुरेख टिपलं. नव्या देशात नॉस्टेल्जिक करणार्‍या गोष्टी व थोडा काळ गेल्यावर नव्या परिस्थितीत आपलं रुळणं प्रियाने "पाऊस पापणीआड ...कधीचा... असतो!" द्वारे साकारलं. चक्रपाणिचं "बायको"वरील लेखाचं अभिवाचन ऐकताना मजा आली. सईच्या "चॉपस्टिकविषयी" या लेखाच्या अभिवाचनाततून व त्यानंतरच्या गप्पांमधून "उचिवा" व "सोतोवा" या शब्दांची माझ्या शब्दकोषात भर पडली. "सोतोवा"चं व्यापक रूप व अशा परिस्थिती साधला जाणारा/साधावयाचा संवाद यावर अत्यंत कौशल्यपूर्ण व आकर्षक विवेचन संगीताने आपल्या "अंतिम युद्ध - भाग ६" या लेखाच्या अभिवाचनानंतर केलं. मंजिरी यांचा "गप्पा" हा लेख व बुजुर्ग कवी श्री. महादेव केशव दामले यांची "असे एखादे घर असावे" ही कविता यांचं अभिवाचनही "शब्दबंध"मध्ये झालं.

ई-सभा भरवण्याची तसेच एकाच वेळी इतक्या लोकांशी गप्पा करण्याची माझी पहिलीच वेळ होती. पण या सभेमध्ये आम्ही सर्व अगदी दररोज एकमेकांना भेटत आलो आहोत इतकी जवळीक जाणवली. एकंदरीत मजा आली.


सुमेधा क्षीरसागर (बेलमाँट, कॅलिफ़ोर्निया, अमेरिका)
"माझिया जातीच्या" इतरांशी संवाद साधता येणं हा माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठा भाग होता. एरवी ब्लॉगविश्वाची सफर केली की बरेच काही नित्यनवे वाचायला मिळतेच की. त्यातून आत्तापर्यंत फक्‍त ब्लॉगच्या नावाने किंवा ID ने ओळखणार्‍यांचे आवाज ऐकायला मिळाले, ब्लॉगवरील प्रतिक्रियेपलिकडे अधिक गप्पा झाल्या हे सगळ्यात महत्त्वाचे! प्रत्येकानी आपापल्या कार्यमग्नतेमधून वेळ काढून या सभेचा आनंद घेतला यातच या माध्यमाचे सगळ्यांसाठी असलेले महत्त्व आणि जिव्हाळा दिसून आला. भविष्यात पुन्हा असे व्यासपीठ मिळो न मिळो, किंवा कदाचित इतर कुठल्या स्वरुपात मिळेल, हे शब्द-बंध चिरस्मरणात राहतील.


चक्रपाणि चिटणीस (सॅन होजे, कॅलिफ़ोर्निया, अमेरिका)
शब्दबंधची कल्पना जेव्हा मला विरोपातून कळली,तेव्हाच तिच्याबद्दलचे नाविन्य म्हणा किंवा कुतूहल आणि इतर सहभागींबरोबर जालनिशीवरील नोंदींच्या माध्यमातून संवाद साधण्याची मिळालेली संधी या दोन मुख्य कारणांमुळे सहभाग निश्चित केला.निलेश,प्रशांत,नंदन,गायत्री,प्रिया,सुमेधा,सई,संगीताताई आणि आशाताई - जगाच्या वेगवेगळ्या कोपर्‍यांमध्ये विखुरलेले,वेगवेगळ्या वयोगटातले,वेगवेगळी शैक्षणिक नि व्यावसायिक पार्श्वभूमी लाभलेले उपक्रमी;पण सगळ्यांना एकत्र जोडणारा समान धागा म्हणजे जालनिशा नि त्यातून प्रकट होणार्‍या भावभावना,विचार यांचे निर्माते असलेले ते शब्द. आणि म्हणूनच त्यांचं आदानप्रदान म्हणजे शब्दबंध. या वेबिनारमधून प्रकर्षाने जाणवलेली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या सहभागी उपक्रमींची संवेदनशील मनं,मराठी मातीशी जोडली गेल्यापासून आजतागायत घट्ट असलेली नाळ आणि जे काही जाणवतं ते प्रकट करण्याची शब्दताकद.मग ते शब्द कधी निलेशच्या ’बाजार’ आणि ’भारत अधूनमधून माझा देश आहे’ मधला उद्विग्नतेचा प्रामाणिक स्वीकार दर्शवितात;तर कधी प्रशांतच्या ’सीताबाई’,संगीताताईंच्या ’समवयस्क’ येसाबाई किंवा माझा ’जानू’ डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा करून जातात. झणीच गायत्रीच्या शब्दांमधून उतरलेली कलापिनी देवींची मैफ़ल बनतात आणि लगेच दुसर्‍या क्षणी कोल्हापुरातल्या कोणत्याशा नाक्यावर ’म्हाराश्ट दिना’निमित्त झालेला संवाद ऐकत तिच्यासोबत उभे राहतात.कधी प्रियासारखं पापणीआडच्या पावसात चिंब भिजवून टाकतात; तर कधी सुमेधाच्या त्रिवेणीमधून फक्त तीनच ओळींत लाखमोलाची बात सांगून जातात.कौतुक आणि हेवा एकाच वेळी वाटावे असे सईचे जपानमधले अनुभव,नंदनचे विविधांगी चौफेर वाचन आणि त्याचे प्रकटीकरण,सर्वात ज्येष्ठ उपक्रमी असलेल्या आशाताईंचा तरुणांनाही लाजवेल असा उत्साह आणि स्काइपसारख्या खेळण्याने खेळायची त्यांची तयारी हे सगळं सगळं ’शब्दबंध’ने अनुभवायला मिळालं. नवे मित्रमैत्रिणी मिळाले वगैरे ठराविक छापाचे संवाद लिहीत बसणार नाही मी;पण मर्‍हाटमोळ्या संवेदनशील मनांचा जगात सर्वत्र होत असलेला वावर,त्याविषयीचे कौतुक,अभिमान व समाधान, आंतरजालासारख्या आभासी माध्यमातून त्यांच्या हव्याहव्याशा वाटणार्‍या शब्दांशी - आणि पर्यायाने त्यांच्याशी - संवाद साधायला मिळणं ही या शब्दबंधने साधलेली सगळ्यात मोठी किमया आहे,असे मला वाटते.

एकंदरीतच हा प्रयोग पूर्ण यशस्वी झाला असे मी म्हणेन.यावेळी आलेल्या तांत्रिक अडचणी,त्यांवर लागलीच पुढच्या मिनिटाला तोडगा काढायची तयारी व प्रयत्न,हे सगळे करताना वेळेशी,दैनंदिन व्यापांशी आणि अर्थातच काहींच्या आंतरजालीय जोडणीशी (इन्टरनेट कनेक्शन!:))झालेल्या झटापटी आणि इतके सगळे असतानाही चर्चा करायला,आपल्या विचारांची,मतांची देवाणघेवाण करायला,संवाद साधायला (आणि स्काइपच्या सामुदायिक चावडीवर टगेगिरी करायलाही!;)) प्रतिमिनिट तत्पर असलेले आम्ही उपक्रमी म्हणजेच १००% यश नाही का? :)


निलेश गद्रे (मेलबर्न, ऑस्ट्रेलिया)
शब्दबंध संदर्भात प्रशांतने मला सांगितलं आणि ऐकताच कल्पना एकदम आवडली. पहिलीच वेळ असल्याने फार लोकांना सहभागी करून घेता न आल्याचं थोडं वाईटही वाटलं. आणि मग सुरू झाला एक आनंददायी प्रवास.

अगदी मी जिचा ब्लॉग रेग्युलरली वाचतो ती गायत्री असूदे किंवा ह्याचा इतका सुंदर ब्लॉग आहे हे माझ्या गावीही नव्हतं असा चक्रपाणी. एकापाठोपाठ लोकं भेटत गेले. सुमेधा, प्रिया, नंदन, सई हे लोकं भेटले. आपल्या ब्लॉगद्वारे वेगवेगळ्या विषयांना हात घालणारी संगीता भेटली, आशयघन कविता करणाऱ्या आशाताई भेटल्या.

गप्पा टप्पा झाल्या. मैत्री झाली. टिकावी, वाढावी एवढीच इच्छा. आमच्यापेक्षा सकस आणि चांगलं लिहिणारे कित्येक लोक ह्या उपक्रमात सहभागी नव्हते. तांत्रिक कारणांनी सदस्यसंख्या मर्यादित होती. पण पुढच्या वेळी मात्र तांत्रिक अडचणींवर तोडगा काढून अधिकाधिक लोकांना सहभागी होता यायला हवं.


संगीता गोडबोले (डरहॅम, नॉर्थ कॅरोलिना, अमेरिका)
खरं सांगायचं तर प्रशांतनी शब्दबंधची कल्पना मांडली तेव्हा माझी प्रतिक्रीया संमिश्र होती. कल्पना चांगलीच होती, पण अनामिकतेचे आवरण उचलले जाणे हे ही थोडेसे अस्वस्थ करणारे होते. त्याचबरोबर इतर ब्लॉगकारांची इ-भेट घेण्याची उत्सुकताही होती. अखेर उत्सुकतेचा विजय झाला आणि मी या प्रकल्पात सहभागी होण्याचे ठरवले.

कार्यक्रमासंबंधी इतरांनी जे लिहीले आहे त्यात माझ्या भावना आधीच उतरल्या आहेत, त्यामुळे वेगळं काही लिहीत नाही.

यापुढे अधिक लोकांना सहभागी करून घेता यावं असं वाटतं.

त्याशिवाय खालील कल्पनांचा विचार करता येईल:


  • चर्चा/गप्पा करायला थोडा अधिक वेळ असावा का?


  • एखादा विशिष्ट विषय असावा का काही सभांत तरी?


  • अधिक लोकांना सहभागी करायचं असेल तर प्रत्येकाने वाचन नं करता मागील सभेत ज्यांनी वाचन केले त्यांनी पुढील सभेत श्रोत्यांची भूमिका घ्यावी का?


गायत्री नातू (कोलंबस, ओहायो, अमेरिका)
प्रशांतची ब्लॉग-वाचनाची कल्पना प्रियामार्फत मला कळली तेव्हा 'मराठी ब्लॉग' आणि 'गप्पा ठोकणे' या खास आवडीच्या गोष्टी आणि many-to-many voice chat चं नावीन्य यामुळे या प्रयोगात भाग घ्यावा असं वाटलं. शिवाय कट्ट्यावर जमून किंवा मैत्रिणीच्या घरासमोरच्या गल्लीत एक पाय सायकलवर ठेवून तासभर चालवलेलं गप्पाष्टक टगेगिरीसारखं वाटतं उगाच. इथे मात्र ई-सभेचं सदस्यत्व मिळाल्यामुळे कसं भारदस्त वाटायला लागलं. ऐनवेळी उपटलेल्या परीक्षेचा नबडूपणा घ्यायचा की मार्क्सविरोधी धोरण स्वीकारून तीन तास ई-सभागिरी करायची, याचं उत्तर अभिवाचन सुरू झाल्यावर मिळालं. आपण नुसताच डोळ्यांनी वाचलेला एखादा लेख खुद्द लेखक/ लेखिकेच्या तोंडून विशिष्ट आघात, हेल आणि विरामांसकट ऐकताना जाम मजा येते राव! तीन-साडेतीन तास कसे निघून गेले कळलंही नाही.
चक्रपाणी आणि प्रशांतने सुरेख आढावा घेतला आहेच 'शब्दबंध'चा..त्यामुळे ही आयडियाची कल्पना काढल्याबद्दल प्रशांतचे, इतके छान ब्लॉग लिहिल्या-वाचल्याबद्दल शब्दबंधच्या सदस्य भिडूंचे आणि एकूणातच संगणक आणि आंतरजाल आणि त्यामार्फत दळणवळण सहजशक्य करून देण्यास सहाय्यभूत झालेल्या सर्व घटकांचे खूप आभार.

अशा प्रयोगात अजून जास्त लोकांना सहभागी होता येऊ दे अशी स्काईपचरणी प्रार्थना. आणि audio-video blogging चा प्रसार होण्याइतपत ब्यांडविड्थ वाढो अशी समस्त ISPच्या चरणी प्रार्थना.


प्रिया बंगाळ (टस्कलूसा, अलाबामा, अमेरिका)
आपण सगळे एकेमेकांना प्रत्यक्ष ओळखत नाही. फक्त लेखांमधून, कवितांमधून म्हणजेच शब्दांमधून आपली ओळख, म्हणून ’शब्दबंध’! -- काय कल्पना आहे नंदनची! :-) या अभिवाचनाबद्दल पहिल्यांदा ऐकलं, तेव्हापासूनच खूप उत्सुकता होती सगळ्यांशी गप्पा-टप्पा करायची. प्रत्यक्ष भेटलो तेव्हा मला bandwidth चा थोडा प्रॉब्लेम आला, पण एकंदरीत मजा आली. सगळ्यांचे लेख, त्यावरील चर्चा, थोड्या गप्पा, थोडी चेष्टा-मस्करी... पुन्हा असं एकत्र जमायला नक्की आवडेल. मी जिचा ’गप्पा’ हा लेख वाचला त्या मंजिरीची परवानगी घेण्याच्या निमित्ताने ओळख झाली. एवढं सहज-सुंदर लिखाण हल्ली ब्लॉगर वर कमीच दिसतं! या निमित्ताने तुझ्या लिखाणाचे अनेक चाहते आहेत, आणि सध्या घेतलेला ब्लॉग-संन्यास सोडून परत लिहीती हो, असं मंजिरीला सांगावंसं वाटतंय.
नंदन होडावडेकर (सॅन डिएगो, कॅलिफोर्निया, अमेरिका)
शब्दबंधच्या कल्पनेबद्दल आणि गेल्या महिन्यात ती कल्पना प्रत्यक्षात कशी उतरली याबद्दल वर आपण वाचलेच. वेगवेगळ्या अनुदिनीकरांकडून त्यांचे लेखन प्रत्यक्ष ऐकणे हा खरंच एक वेगळा आणि छान अनुभव होता. ही कल्पना मांडून, तिचा पाठपुरावा करून आणि शब्दबंधच्या दिवशी नेटकं संयोजन करून हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल प्रशांतचे आभार मानणे औपचारिक होईल, पण त्याच्यामुळेच हा उपक्रम सुरू झाला हे इथे नक्कीच नमूद करावं लागेल.

मराठीत हा पहिलाच उपक्रम असल्याने, सहभागी अनुदिनीकारांची संख्या मर्यादित ठेवावी लागली. सुरूवातीचा छोटासा प्रयोग म्हणून. अर्थातच यामागे कंपूबाजीचा वगैरे काडीमात्रही संबंध नाही. प्रशांतने वर म्हटल्याप्रमाणे त्याने प्रथम त्याच्या तीन परिचित मित्रांना विचारले. मग त्यापैकी काहींनी इतरांना विचारले एवढंच. भविष्यातही असेच वेगवेगळ्या अनुदिनींचे शब्दबंध प्रत्यक्षात उतरावेत, असं वाटतं. त्या संदर्भात संगीता यांनी वर मांडलेले तीन मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. 'अधिकस्य अधिकं फलम्' या न्यायाने पुढच्या शब्दबंधात अधिक सदस्य असावेत, वाचनाला आणि चर्चेला अधिक वेळ मिळावा आणि सहभागी सदस्यांचे एकमत झाल्यास एखाद्या विषयावरही चर्चा व्हावी, असं वाटतं.

आशा जोगळेकर (एन्डरसन, साऊथ कॅरोलिना, अमेरिका)
शब्दबंध नाव एकदम आवडलं. ह्या एका विशेष बंधानी आपण एकमेकांशी जोडले गेलो आहोंत. शब्द जे आपल्या मनातलं विश्व लेखणीतल्या शाईनी व्यक्त करतात, जे आपल्याला भावतात, लक्ष वेधून घेतात अन एका अनामिक नात्यानं जोडून ठेवतात, तेच वार्‍याच्या झुळुकेसारखं सुखावतात. शब्द लुब्धांना मनातलं सगळं, अगदी वाट्टेल ते सांगायला उद्युक्त करतात. आपला संवाद आपणासी असला तरी इतरांनाही त्यांत सामील करून घेतात अन् अनुदिनी अनुतापे तापलेल्या जिवांना थंडावा देतात. असे हे शब्द आपल्याला एकमेकांशी जोडून ठेवणारे ठरोत. व्यक्तिगत मतभेद असले अन् ते व्यक्त करायचं स्वातंत्र्य शब्द बंधात आहे, तरी हा जो रेशमी बंध आपल्यात निर्माण झालाय त्यात इतरही नवनवे शब्द-वेडे जोडले जावोत. कुणास ठाऊक कोऽहमचं उत्तर ही त्यांतच मिळून जाईल.

Sunday, June 8, 2008

शब्दबंध २००८ - कार्यक्रम


प्रस्तावना : प्रशांत मनोहर
म्हाराश्ट्र दीन : गायत्री नातू
भारत अधुन मधुन माझा देश आहे : नीलेश गद्रे
पाऊस पापणीआड ...कधीचा... असतो! : प्रिया बंगाळ
अनंत भुवन : प्रशांत मनोहर
सीताबाई : प्रशांत मनोहर
समवयस्कं : संगीता गोडबोले
जानू : चक्रपाणि चिटणीस
त्रिवेणीची वेणी : सुमेधा क्षीरसागर
ह्या गंगेमधि गगन वितळले : नंदन होडावडेकर
चॉपस्टिक्सविषयी : सई मुंडले
ऋ तु : आशा जोगळेकर
कलापिनी : गायत्री नातू
त्या संगीतकलेने नटली अवघी ही सृष्टी : प्रशांत मनोहर
बाजार : नीलेश गद्रे
छुपे तुझे हे मनसुबे फुलण्याचे : संगीता गोडबोले
वर्षेची चाहूल : प्रशांत मनोहर
बायको : चक्रपाणि चिटणीस
V-Day : सई मुंडले
पुन्हा मी : नीलेश गद्रे
आतलं वर्तुळ : सुमेधा क्षीरसागर

अंतिम युद्धं - भाग ६ : संगीता गोडबोले
गप्पा : मंजिरी : प्रिया बंगाळ
असे एखादे घर असावे : महादेव केशव दामले : प्रशांत मनोहर

समारोप : प्रशांत मनोहर

Sunday, June 1, 2008

शब्दबंध २००८ - संकल्पना

कथा, लेख अन् निबंध, काव्य, गीत, मुक्तछंद
व्यक्त होती ब्लॉगकार, लिहिण्याचा एक नाद
अभिवाचन करण्या अन् लुटण्या वाङ्‍मयसुगंध
सज्ज आज एकसंध व्यासपीठ "शब्दबंध"
मराठीभाषेत ब्लॉगलेखन करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. कविता, लेख, लघुकथा, अनुवाद, विडंबन, प्रवासवर्णन, पाककृती, प्रकाशचित्रे, प्रबोधन, इत्यादि विविध विषय त्यात हाताळलेले दिसतात. ब्लॉगलेखकांप्रमाणेच ब्लॉगवाचकवर्गही वाढला आहे. अर्थात, स्वतः ब्लॉगलेखकसुद्धा वाचक असतोच. ब्लॉगवरील प्रतिक्रियांद्वारे ब्लॉगकारांमधील वैचारिक देवाणघेवाण वाढत जाते व ब्लॉगमैत्र निर्माण होतात. अशा ब्लॉगमैत्रांकडून त्यांच्या साहित्याचं अभिवाचन ऐकण्यास कोण उत्सुक नसेल? "शब्दबंध"ची संकल्पना यातूनच निर्माण झाली. ईमेलद्वारे काही ब्लॉगकारांच्या संपर्कात असताना, वेबिनारद्वारे ब्लॉगवरील लेखांचं वाचन करण्याची कल्पना सुचली व ती ब्लॉगमित्र-मैत्रिणींनी उचलून धरली. वेबिनार भरवताना ब्लॉगकारांमधील भौगोलिक अंतरांमुळे एकत्र जमताना येणारी प्रमाणवेळांची बंधनं व संबंधित अडचणी लक्ष्यात घेऊन पहिल्या प्रयोगात ई-सभेच्या सदस्यांची संख्या १० इतकी मर्यादित ठेवली. या सभेसाठी "शब्दबंध" हे नाव नंदन होडावडेकर यांनी सुचवलं व सभेच्या सर्व सदस्यांनी त्यास अनुमोदन दिलं.

तर मंडळी, "शब्दबंध - जून २००८"मध्ये मी, प्रशांत उदय मनोहर, आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो.

या सभेत सहभागी होणार्‍या ब्लॉगकारांची व त्यांच्या ब्लॉगांची नावं खालीलप्रमाणे -

निलेश गद्रे, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - कोहम?
सई मुंडले, कुमामोतो, जपान - थोडे शङ्‍ख नी शिम्‍पले
संगीता गोडबोले, डरहॅम, नॉर्थ कॅरोलिना, अमेरिका - कसंकाय
आशा जोगळेकर, एन्डरसन, साउथ कॅरोलिना, अमेरिका - झुळुक
गायत्री नातू, कोलंबस, ओहायो, अमेरिका - माझी माय सरस्वती, शब्दलुब्ध
प्रिया बंगाळ, टस्कलूसा, अलाबामा, अमेरिका - वाट्टेल ते...
चक्रपाणि चिटणीस, सॅन होजे, कॅलिफ़ोर्निया अमेरिका - मनातलं सगळं, खूप काही थोडक्यात, माझ्या अवतीभवतीची फुलपाखरं
सुमेधा क्षीरसागर, बेलमाँट, कॅलिफ़ोर्निया, अमेरिका - आपुला संवाद आपणासी... ,समिधाच सख्या या....
नंदन होडावडेकर, सॅन डिएगो, कॅलिफ़ोर्निया, अमेरिका - मराठी साहित्य (Marathi Literature), अनुदिनी अनुतापे
प्रशांत मनोहर, लॉस ऍन्जेलिस, कॅलिफ़ोर्निया, अमेरिका - लेखणीतली शाई