Friday, February 13, 2009

शब्दबंध २००९ - उद्घोषणा



सप्रेम नमस्कार.

"शब्दबंध" ही मराठी ब्लॉगकारांची ई-सभा ६/७ जून २००९ रोजी आयोजित करण्याचा विचार आहे. मराठी ब्लॉगांमध्ये लघुनिबंध, कथा, प्रवासवर्णने, कविता, विडंबन, व्यक्तिचित्र, पाककृती, इत्यादि वैविध्यपूर्ण लेखनाद्वारे ब्लॉगकार अनेक वर्षांपासून मनोरंजन, ज्ञानदान तसेच समाजप्रबोधन करत आलेले आहेत. आपल्या ब्लॉगांमधल्या निवडक पोस्टांचं अभिवाचन करणे व ब्लॉगजगतातल्या आपल्या बांधवांशी मनमोकळ्या गप्पा मारणे हा या ई-सभेचा उद्देश आहे. मराठीमध्ये १००% स्वतःचं लेखन असलेला किमान एक ब्लॉग असलेल्या कुठल्याही ब्लॉगकाराला यात सहभागी होता येईल. या ई-सभेत अधिकाधिक ब्लॉगकारांना सामील करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी सर्वांकडून सहकार्य व ज्यांना शक्य असेल त्यांच्याकडून मदत अपेक्षित आहे.

ब्लॉगकारांच्या प्रतिसादाचा अंदाज आल्यावर एखाद्या शनिवार/रविवारची तारीख निश्चित करता येईल.

जगभर चालणार्‍या या ई-सभेचं स्वरूप साधारणपणे असं असेल -
जपान-ऑस्ट्रेलियापासून ही सभा सुरू होईल. सत्रांची सूत्र क्रमाक्रमाने पश्चिमेकडे हस्तांतरित होऊन भारत-आफ़्रिका-युरोप-अमेरिका या क्रमाने अभिवाचनाचं सत्र सुरू राहील.

देशांतल्या/देशसमूहांतल्या/सत्रांतल्या सहभागी ब्लॉगकारांच्या संख्येनुसार सत्राच्या वेळा व सत्र भरवण्याचं माध्यम ठरवावं लागेल.
स्काईप (www.skype.com)च्या मेसेंजरवर एका वेळी २५ सदस्य सभेमध्ये सहभागी होऊ शकतात. समांतर सत्रे ठेवायची असल्यास स्काईपचा विचार करता येईल, पण त्यापेक्षा अधिक चांगलं माध्यम असल्यास जास्त सोयीस्कर असेल. डिमडिम (www.dimdim.com) द्वारे एकावेळी १०० सदस्य सहभागी होऊ शकतात. अर्थात, याबद्दल चाचणी घेणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त अमेरिकेत व काही देशांमध्ये निःशुल्क टेलिकॉन्फ़रन्सिंगची सोय आहे. या माध्यमांपैकी काहींचा आपल्याला निश्चित उपयोग होऊ शकतो. अर्थात, आणखी माध्यमं उपलब्ध असल्यास त्याची माहिती अवश्य द्या. अधिकाधिक लोकांना सहभागी होता आलं, तर आपल्या सत्राप्रमाणेच इतर सत्रांतल्या सदस्यांचं अभिवाचन ऐकण्याचा आस्वादही सर्वांना घेता येईल. या सत्रांच्या सूत्रसंचालन करण्याची तुमची तयारी असेल तर अवश्य कळवा.

या ई-सभेत सहभागी होण्यासाठी इच्छुक ब्लॉगबांधवांनी shabdabandha@googlegroups.com या गुगलग्रुपमध्ये प्रवेश घ्यावा अशी विनंती. त्यासाठी shabdabandha@gmail.com येथे ईमेल पाठवावा. ईमेलमध्ये आपलं नांव, शहर/राज्य/देश तसेच आपल्या मराठी ब्लॉगचं शीर्षक व दुवा अवश्य द्या.

ई-सभेच्या आयोजनासाठी मदत करू इच्छित असल्यास त्याबद्दलही लिहा.

सभेची आखणी व नियोजन करण्याच्या दृष्टीने कृपया आपल्या सहभागाबद्दल ३० एप्रिल २००९ पर्यंत कळवा.

धन्यवाद.
-शब्दबंध