Sunday, September 5, 2010

शब्दबंध २०१० : वृत्तांत



"शब्दबंध २०१०" ई-सभेमध्ये जवळजवळ सर्व सत्रांमध्ये उपस्थित असलेले जेष्ठ शब्दबंधी श्री. प्रमोद देव यांनी त्यांच्या पूर्वानुभव या ब्लॉगवर या ई-सभेचा आढावा घेतला आहे. त्यांच्या संमतीने तो इथे उतरवत आहे. अभिवाचन व श्रवण सहभाग असलेल्या शब्दबंधींच्या यादीत सुधारणा करण्यात आली आहे याची कृपया नोंद घ्यावी. शब्दबंधींच्या कार्यबाहुल्यामुळे वृत्तांत प्रकाशनाला प्रचंड विलंब झाला त्याबद्दल शब्दबंध व्यवस्थापकीय मंडळ दिलगीर आहे.
-----------------------------------------
होणार, होणार म्हणता म्हणता २०१० च्या शब्दबंधचे ई-संमेलन ५ जून २०१० रोजी पार पडले.
शब्दबंध २००९ च्या आधी जे एक उत्साहाचे वातावरण होते ते ह्यावेळी फारसे जाणवले नाही त्यामुळे ह्या २०१० च्या संमेलनात कसा प्रतिसाद मिळेल ह्याबाबत मी स्वत: साशंक होतो...पण तरीही प्रत्यक्ष संमेलनाच्या वेळी प्रत्येक सत्रात( प्रत्येकी साडेतीन तासांची चार सत्रे) अभिवाचक आणि श्रोत्यांची उपस्थिती लक्षणीय होती. उत्साहाने आपापल्या साहित्याचे वाचन करणारे अभिवाचक आणि दिलखुलास दाद देणारे श्रोते असे एकूण उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. सकाळी ९ वाजता सुरुवात झालेले हे संमेलन उत्तररात्रीपर्यंत उत्तरोतर रंगतच गेले.

तांत्रिक बाजूंबद्दल बोलायचे झाल्यास....बर्‍याच सदस्यांना आणि श्रोत्यांना अजून स्काईप हे माध्यम नेमके कसे वापरायचे हे नीटसे कळलेले नाहीये. त्यामुळे सत्रसंचालकांना सत्र सुरु करतांना अनंत अडचणी येत होत्या आणि त्यात बराच वेळही वाया जात होता. ह्या इ-संमेलनाआधी सराव सत्र घेऊन सदस्यांना आणि श्रोत्यांना स्काईपबद्दलची पूर्ण माहिती,ध्वनीग्राहक (मायक्रोफोन) जोडणी,देवनागरीतून लेखन करण्यासाठी बरहा आयएमईचा वापर कसा करायचा वगैरे तांत्रिक माहिती पूरवून आम्ही आमच्या परीने खबरदारी घेतलेली होती...पण बरेचजण अशा सराव सत्रांना त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे हजर राहू शकले नाहीत....अशा लोकांच्या आयत्यावेळी येण्यामुळे खूपच गोंधळ उडत होता. तरीही भगीरथ प्रयत्नांनी आम्ही सगळे त्यावर बर्‍यापैकी मात करून संमेलन यशस्वी करू शकलो...हेही नसे थोडके. मात्र एकच सांगतो...सभासदांनी स्काईपचा योग्य वापर कसा करावा....संमेलनाच्या वेळी काय काळजी घ्यावी ह्याबद्दलच्या सूचना नीट समजून घेऊन त्या जर व्यवस्थितपणे अंमलात आणल्या असत्या तर कदाचित वाया गेलेल्या वेळात अजून एखादे सत्र होऊ शकले असते असे अतिशयिक्तीने म्हणावेसे वाटते. असो....

ह्यावेळच्या शब्दबंधमध्ये एकूण ३१ अभिवाचकांनी आपापले साहित्य वाचून दाखवले. कविता, प्रवासवर्णन, कथा, ललित लेखन, माहितीप्रद तसेच ऐतिहासिक महत्वाचे, विनोदी तसेच गंभीर, विचार करायला प्रवृत्त करणारे, करूण, भावूक करणारे असे विविध रसांनी नटलेले साहित्यप्रकार अभिवाचकांनी आपापल्या आवाजात सादर केले.

गेले दोन-अडीच महिने ह्या संमेलनाची तयारी सुरु होती.
ह्यावेळी संमेलनाचा संयोजक होता संग्राम भोसले. त्याला मदतनीस म्हणून मी आणि प्रशांत मनोहर होतो.
सभासदांना सराव सत्रापासूनच मी आणि विनायक रानडे हे तांत्रिक सहकार्य करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा यशस्वी प्रयत्न करत होतो.

ह्या संमेलनात अभिवाचक म्हणून सामील झालेले :

१)संग्राम भोसले (पुणे), २) प्रशांत मनोहर (नागपूर), ३) प्रमोद देव (मुंबई),४) प्रभाकर फडणीस (मुंबई) ५) विनायक रानडे (पुणे), ६) नरेंद्र गोळे (डोंबिवली), ६) जयंत कुलकर्णी (पुणे), ७) आशा जोगळेकर (अमेरिका), ८) श्रीराम पेंडसे (पुणे), ९) संतोष साळुंके (मलेशिया), १०) तुषार जोशी (नागपूर), ११) हर्षा स्वामी (पुणे), १२) अमोल वाघमारे, १३) प्रतिमा मनोहर (नागपूर), १४) विद्याधर भिसे (मुंबई), १५) अमेय धामणकर (ठाणे), १६) राहूल पाटणकर (पुणे), १७) महेंद्र कुलकर्णी (मुंबई), १८) नीलेश गद्रे (ऑस्ट्रेलिया), १९) अपर्णा लळिंगकर (बंगळुरु), २०) मीनल वाशीकर (कोल्हापूर), २१) मीनल गद्रे (अमेरिका), २२) प्राजक्ता पटवर्धन (अमेरिका), २३) हेरंब ओक (अमेरिका), २४) शंतनू देव (कॅनडा), २५) संगीता गोडबोले (अमेरिका), २६) भाग्यश्री सरदेसाई (अमेरिका), २७) नचिकेत कर्वे (अमेरिका), २८) अपर्णा संख्ये (अमेरिका), २९) समीर सामंत (मुंबई) ३०) श्रीकांत शिरभाटे आणि ३१) नंदन होडावदेकर (अमेरिका)

संमेलनात श्रोते म्हणून सामील झालेले....
१) सम्राट फडणीस (ई-सकाळ, पुणे) २) रविंद्र जाधव (मुंबई), ३) आनंद पत्रे (हैद्राबाद), ४) सागर बाहेगव्हाणकर (पुणे), ५) सुरेश पेठे (पुणे), ६) अनिकेत वैद्य (पुणे), ७) प्रशांत काळकर (पुणे) इत्यादि.

खास,संमेलनाच्या वृत्तांत संकलनासाठी ई-सकाळचे सहाय्यक संपादक सम्राट फडणीसही बहुतेक सत्रांमध्ये उपस्थित होते.

Wednesday, June 2, 2010

शब्दबंध २०१० - सत्रांचं वेळापत्रक व सदस्यांची यादी


"शब्दबंध" ही मराठी ब्लॉगकारांची ब्लॉग अभिवाचनाची ई-सभा भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवार दि. ५ जून २०१० रोजी सकाळी ९:०० वाजता सुरू होणार असून ६ जून २०१० रोजी पहाटे २:३० वाजेपर्यंत चालेल. सत्रांचं वेळापत्रक व सहभागी सदस्यांची नावं खालीलप्रमाणे:

भारत, शनिवार दि. ५ जून २०१०
सत्र क्र. १ – भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९:०० ते दुपारी १२:३०
सहभागी सदस्य:
१. संग्राम भोसले (निमंत्रक, शब्दबंध २०१०)
२. प्रशांत उदय मनोहर - लेखणीतली शाई
३. तुषार जोशी - तुषार जोशी, नागपुर
४. संतोष साळुंके - नवा शिपाई
५. हर्षा - काही मनातलं - तुमच्या नि माझ्यासुद्धा
६. नरेंद्र गोळे - नरेंद्र गोळे
७. श्रीराम पेंडसे - श्रीराम



सत्र क्र. २ – भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १:३० ते दुपारी ४:३०
सहभागी सदस्य:
१. क्रांती साडेकर
२. प्रभाकर फडणीस - आवडलेली पुस्तके
३. जयंत कुलकर्णी - मराठीतील लेखन-जयंत कुलकर्णी
४. विद्याधर - "बाबा"ची भिंत !
५. पल्लवी - मनातले भाव कवितेच्या रूपात
६. अमेय धामणकर - मदनबाण
७. प्रतिमा मनोहर - मनातलं विश्व
८. जयश्री कुलकर्णी - माझी मी अशी मी
९. लीना मेहेंदळे


सत्र क्र. ३ – भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ५:०० ते रात्रौ ८:००
सहभागी सदस्य:
१. प्रमोद देव - पूर्वानुभव
२. क्रांती साडेकर - अग्निसखा
३. चैताली आहेर - माझ्या कविता
४. विनायक रानडे - विनायक उवाच
५. राघव - कवितांच्या संगतीत
६. हिमांशू डबीर - मनापासून मनापर्यंत
७. निलेश गद्रे - कोहम?


सत्र क्र. ४ – भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्रौ १०:३० ते रविवार दि. ६, पहाटे २:३०
सहभागी सदस्य:
१. मीनल गद्रे - उर्मी
२. संगीता गोडबोले - कसंकाय
३. प्राजक्ता पटवर्धन - प्राजु
४. अपर्णा - माझिया मना
५. नंदन होडावदेकर - मराठी साहित्य
६. हेरंब - वटवट सत्यवान !!
७. भानस - Sardesais
८. शंतनु देव - मेपलची पाने
. आशा जोगळेकर - झुळुक

धन्यवाद.

-शब्दबंध

Tuesday, March 9, 2010

शब्दबंध २०१० - उद्घोषणा


२००८ मधे १० लोकांनी साकारलेल्या शब्दबंधने मागच्या वर्षी २९ लोकाना सामावून घेतलं! मराठी ब्लॉगर्सच्या या जागतीक ई-सभेचे आयोजन आपण याही वर्षी दिमाखात करणार आहोत. मित्रहो तारखांची नोंद करा - ५ आणि ६ जुन २०१०!
परत एकदा आपण सर्वजण या सभेत भेटायचंय. काही नवे तर काही जुने शब्दबंधी घेऊन यायचंय. जिथे आहात तिथून, थेट सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचायचंय. परत एकदा सर्व हौशी मराठी ब्लॉगर्सना त्यांचं लिखाण त्यांच्या थाटात व्यक्त करण्यासाठी हे खास व्यासपीठ सजवायचंय.

मागील वेळेसारखेच, मराठीमध्ये १०० % स्वतःचं लेखन असलेला किमान एक ब्लॉग असलेल्या कुठल्याही ब्लॉगकाराला यात सहभागी होता येईल. या सभेची व्याप्ती अधिकाधिक वाढवणे आणि अधिकाधिक मराठी ब्लॉगर्सना त्यांनी लिहिलेल्या, त्याना आवडणाऱ्या, आणि त्यांच्या लिखाणाचं वाचन करण्यासाठी ई-व्यासपीठ ऊपलब्ध करून देणे हा यावेळीही हेतू आहे. मराठीमधलं लिखाण हा एकच समान दुवा पकडून आपण सर्वजण एकत्र येणार आहोत. प्रवास वर्णनं, अनुभव, कथा, कविता, व्यक्तीचित्रं, लघुनिबंध, तंत्रज्ञान आणि अशाच कित्येक छटांनी सजलेल्या मराठी ब्लॉगविश्वाची छोटीशी झलक आपल्याला या सभेमधे साकार करायचीये. तेही अनौपचारीक पद्धतीने.
सर्वसाधारणतः या सभेचं स्वरूप असं असेल. स्काईप, किंवा तत्सम साधन वापरून, आपण वेगवेगळी सत्रं आयोजीत करू. सहभागी होणाऱ्या सर्व हौशी ब्लॉगर्सना या तंत्राची माहिती सभेच्या आधी करून देण्यात येईल. जपान-ऑस्ट्रेलियापासून ही सभा सुरू होईल. सत्रांची सूत्रं क्रमाक्रमाने पश्चिमेकडे हस्तांतरीत होऊन भारत-आफ़्रिका-युरोप-अमेरिका या क्रमाने अभिवाचनाचं सत्र सुरू राहील.

शब्दबंध-२०१० मधे सहभागी होणं सोपं आहे. सहभाग घेण्यासाठी किंवा केवळ आयोजनामधे मदत करण्यासाठीही, कृपया या फॉर्मवर नोंद करावी -https://spreadsheets.google.com/viewform?formkey=dHhIT3dWN21tYWpDVHo4UG9yMlZycWc6MA. तुमच्याबद्दलची माहिती आणि तुमच्या सहभागाचं स्वरूप आम्हाला या फॉर्मवरून कळेल. सर्व जुन्या आणि नव्या शब्दबंधीनी या फॉर्मवरून नोंद करावी ही विनंती. ईथे नाव नोंदवणाऱ्या सर्वाना आपोआप shabdabandha@googlegroups.com मधे प्रवेश दिला जाईल आणि तिथेच पुढच्या सर्व चर्चा होतील. (तुम्ही आधीपासून जरी shabdabandha@googlegroups.com चे सभासद असाल, तरीसुद्धा शब्दबंध-२०१० मध्ये सहभागासाठी, कृपया फॉर्ममधे नोंद करावी. तसदीबद्दल क्षमस्व.)

लवकरच भेटू. आपली वाट बघतोय.

Thursday, June 25, 2009

शब्दबंध २००९ - व्यक्त होती ब्लॉगकार

"शब्दबंध २००९"ला मराठी ब्लॉगकारांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.

शब्दबंधची यंदाची सभा यशस्वी होण्यामध्ये शब्दबंधींचा जसा वाटा आहे, तसंच या ई-सभेची उद्घोषणा प्रकाशित करण्यास मराठी ब्लॉगविश्व, मिसळपाव व मनोगत या संकेतस्थळांची खूप मदत झाली. या सर्व संकेतस्थळांच्या व्यवस्थापकांचे मनापासून आभार. तसेच, ई-सभेत ऑडियो-कॉन्फ़रन्सिंगचं माध्यम उपलब्ध करुन दिल्याबद्दल स्काईपचे तसेच ब्लॉगलेखनासाठी व ई-पत्रव्यवहारासाठी माध्यमे उपलब्ध करुन देणार्‍या
गुगल व वर्डप्रेस आदिंचेही मनापासून आभार. अनावधानाने कुणाचं नाव घेण्याचं राहून गेलं असल्यास त्याबद्दल क्षमस्व.

ब्लॉग-अभिवाचन, चर्चा आणि गप्पांच्या सहाय्याने चार सत्रांमध्ये शब्दबंध साकारणार्‍या शब्दबंधींचे अनुभव त्यांच्याच शब्दांत -


क्रांती साडेकर -

असा आगळा स्नेह जसा की कमलतंतुचा बंध असावा
अक्षय, शाश्वत नात्याला या प्राजक्ताचा गंध असावा

नकळत अलगद गुंतुन जावे, जसा फुलात सुगंध असावा
स्मरणातुनही सुख बरसावे, दर्शनात आनंद असावा

कधी भेटता अंतरातला भाव असा स्वच्छंद असावा,
श्रावणातल्या हिरव्या रानी भरुन जसा मृदगंध असावा

जगावेगळे अमूर्त नाते, जगावेगळा छंद असावा,
अवीट गोडीने भरलेला स्नेहाचा मकरंद असावा


माझा हा एक मस्त अनुभव होता! आधीचे काही दिवस तयारीत, आदल्या दिवशी तर घरच्या लग्नात हळदीच्या जेवणादिवशी जशी सगळी मंडळी रात्र संपली तरी गप्पा मारत बसतात, तसंच वाटत होतं. आणि नंतरचे दोन दिवस तर मेजवानीच मेजवानी! सईचा बिहाग, पूरिया धनाश्री, पूरिया कल्याण, सुंदर सुंदर लेख, कविता, नुसती धमाल! दुपारच्या सत्रात जयुताई, आशाताई, सगळे दिग्गज कलाकार होते, पण स्काइप थोडं रुसलं होतं, आमचा सतत तळ्यात मळ्यात असा खेळ सुरू होता, पण पुन्हा संध्याकाळी सगळं काही मस्त सुरू झालं. प्राजुचे "ठेवणीतले आवाज", प्रशांत, देवकाका, गोळे काका, दीपक, संग्राम, राघव, संगीता, एकसे बढकर एक कलाकार! भल्या पहाटे निलेश, नंदन, चक्रपाणी, प्रशांत, शैलजा, प्राजु, आणि पुन्हा धमाल! एंडी, अभिजित, गौरी, हिमांशु, सगळ्यांनीच मस्त मजा आणली! कुणाची नावं निसटली असतील, तर सॊरी! एकंदरीत धमाल आली. काय लिहावं सुचत नाहीय! सगळ्यांना मनापासून धन्यवाद! आणि शब्दबंधच्या प्रत्येक नव्या उपक्रमाला शुभेच्छा!

हरिप्रसाद (छोटा डॉन) -
ह्यावेळी प्रथमच "शब्दबंध" हा कार्यक्रम ऐकण्याचा व भाग्याने दुसर्‍या सत्रात एका लघुवाचनाच्या रुपाने सामिल होण्याचा योग आला. फारच प्रसन्न आणि उत्तम कार्यक्रम झाला असे मी म्हणेन.

हा एक नवाच अनुभव होता माझ्यासाठी व तो फारच भावला असे म्हणतो ...

पुढच्या वेळी जास्त सक्रिय सहभाग घेण्याचा प्रयत्न करेन, ह्यावेळी अगदीच ऑ क्लॉक रुपरेषा कळाल्याने जास्त काही करता आले नाही याचेच वाईट वाटते. असो, "श्रोता" हा अनुभवही नसे थोडका ...
बाकी बराच कार्यक्रमाचा भाग हा लाईट जाणे व नेट बंद पडणे, बॅचलर लाईफच्या विकांताची वैयक्तीक कामे, स्काईपचा मधेच उडालेला सपोर्ट, इतर दैनदिन समस्या ह्या मुळे मिस्स झाला ह्याचे वाईट वाटते, पुढच्या वेळी आधीच प्लान करुन ठेवेन आणि संपुर्ण सक्रिय सहभाग घेईल असे आनंदाने व उत्साहाने सांगतो ....

ह्यावेळी जे घडले ते नसे थोडके ...

सर्व आयोजकांचे, सक्रिय सहभाग घेणार्‍या कलाकारांचे व मराठी साहित्यावर प्रेम करणार्‍या जनांचे आभार मानावे वाटतात, फारच सुंदर संकल्पना होती ह्या "शब्दबंधची" ....

आपल्या सर्वांचे अनेक आभार व पुढीच सत्रासाठी आमच्या मनापासुन शुभेच्छा ...


शैलजा रेगे -
शब्दबंधच्या चारही सत्रांना मला उपस्थित राहता आलं. भारतीय वेळेनुसारचं पहाटे ४ चं सत्र मात्र शेवटी शेवटी थोडसं हुकलंच! त्याबद्दल वाईट वाटलं. असो.

मीही ह्या उपक्रमात पहिल्यांदाच सामील झाले होते, आणि खरोखर एक अतिशय मस्त अनुभव मिळाला. केवळ शब्दबंधचाच दिवस नव्हे तर, त्या आधी स्काईपच्या चाचण्या घेताना एकमेकांशी केलेल्या गप्पा, चर्चा, अनौपचारीक गुणदर्शनाचे कार्यक्रम, म्हटलेली गाणी, निव्वळ टीपी सारं काही खूप ग्रेट!

सर्व संयोजकांचे आणि भाग घेणार्‍यांचे आभार! :)


मयूर भागवत -
१) लय भारी कल्पना.
२) स्वतः अतिशय व्यस्त असुनही स्काइप कॉलच्या चाचण्या करून मुख्य कार्यक्रमाच्यासाठीची पुर्वतयारी करणे.
३) माझ्यासारख्या "अत्यंत" उशिरा प्रतिसाद देणार्या ब्लोग्गर्सकड़े माहिती इ. साठी पाठपुरावा.

↑↑↑ हे सगळ फार कमी वेळात आणि यशस्वीपणे पार पाडणार्या नियोजक, आणि तितकेच निवेदक यांचे आभार आणि अभिनंदन!
खरंच सगळ्यान्ना धन्यवाद.
लवकरच पुन्हा सर्वांना भेटायची वाट पहातो आहे. तर मित्रांनो, तोपर्यंत छान काहीतरी लिहीत रहा. आम्ही वाचतोच..



प्रमोद देव -
आंतरजालावर स्वत:ची जालनिशी लिहीणारे काही तरूण/तरूणी एकत्र आले आणि झाला एका इ-संमेलनाचा जन्म! त्याला नाव देण्यात आले ’शब्दबंध!’ प्रशांत मनोहर,नंदन होडावडेकर आणि अजून काहीजण ह्यात सामील झाले. वर्ष होते २००८. ह्यावर्षी शब्दबंधचे पहिले इ-संमेलन झाले. भाग घेणार्‍या प्रत्येक सदस्याने आपल्या जालनिशीवरील एखाद-दुसर्‍या लेखाचे/कवितेचे अभिवाचन करायचे ही ती संकल्पना. पहिल्या वर्षी हा प्रयोग लहान प्रमाणात राबवला गेला.
ह्यावर्षी म्हणजे दिनांक ६/७जून २००९ ला हेच संमेलन खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे खूप जास्त जणांच्या सहभागाने यशस्वी झाले. ह्यावर्षी शब्दबंधचे ६० च्या वर सभासद होते. पण प्रत्यक्ष सहभाग २९ सभासदांनीच घेतला. अर्थात पहिल्या संमेलनाच्या तुलनेत ह्यावर्षी अडीचपट जास्त उपस्थिती होती. त्यामुळे हे यश निश्चितच सुखावणारे आहे.
शब्दबंधसारख्या इ-संमेलनासाठी स्काईप हे माध्यम वापरले गेले. स्काईप हा देखिल इतर संवादकांसारखाच(मेसेंजर)एक संवादक आहे ज्यात एकाचवेळी जास्त लोकांना सामावून घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याला इ-सभेचं स्वरूप प्राप्त होऊ शकतं. ह्यावेळी स्काईपचा उपयोग करताना बर्‍याच अडचणी आल्या. तसे बहुतेकजण हे माध्यम पहिल्यांदाच वापरत होते त्यामुळे त्यात असणार्‍या सोयी/अडचणी काही अपवाद वगळता बहुतेकांना नीटशा माहीत नव्हत्या. ह्यासाठी शब्दबंधच्या संमेलनाआधी स्काईपची चांचणी घेण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता. पण कार्यबाहुल्यामुळे म्हणा अथवा काही वैयक्तिक अडीअडचणींमुळे म्हणा त्याला खूपच कमी सभासदांकडून प्रतिसाद मिळाला.
ह्या इ-संमेलनाच्या दृष्टीने विचार केल्यास आलेल्या प्रत्यक्ष अडचणी अशा होत्या.
१)एकावेळी जास्त सभासद एकत्र आल्यावर होणारा गोंधळ...एकजण बोलत असताना इतरांनी शांत राहणे अपेक्षित असते.पण ओसंडून जाणार्‍या उत्साहाच्या भरात ही गोष्ट चटकन लक्षात येत नाही. अर्थात त्यावर उपाय होताच. प्रत्येक सत्राच्या सूत्रसंचालकाने अनुमती देईपर्यंत सर्वांनी आपापले माईक बंद(म्यूट) ठेवणे आणि ह्या पद्धतीने प्रत्येक सत्रात शिस्त राखण्याचा प्रयत्न बर्‍याच प्रमाणात यशस्वी झाला असे म्हणता येईल.
२)प्रत्येक सभासदाच्या जालजोडणीची बॅंडविड्थ वेगळी असल्यामुळे बर्‍याच वेळा संभाषण तुटक तुटक ऐकू येणे.एकाच वेळी जास्त खिडक्या उघडल्यामुळे देखिल बर्‍याचदा बॅंडविड्थ कमी पडत असते. अशा वेळी सभासदाचे सभेतून आपोआप बाहेर फेकले जाणे होत असते. अशावेळी यजमानाने(जो ह्या सभेत इतरांना आमंत्रित करत असतो...ही व्यक्ती सूत्रसंचालक असू/नसू शकते)लक्ष ठेवून त्या सभासदाला पुन्हा आत घेणे वगैरे गोष्टी सातत्याने करायच्या असतात.
३)स्काईपचे व्हर्जन वेगवेगळे असणे की ज्यामुळेही एकमेकांशी संवाद साधण्यात काही अडचणी येत होत्या. स्काईपवर देवनागरीतून लेखी संवाद साधण्यातही काही सभासदांना अडचण जाणवत होती...ज्यावर अजूनही तोडगा सापडलेला नाहीये.

वरील सर्व अडचणींशी सामना करत शब्दबंधचे इ-संमेलन ४ सत्रात पार पडले. प्रत्येक सत्रात अभिवाचक आणि श्रोते मिळून सरासरी १५ जण होते. हे संमेलन अतिशय रंगतदार झाले. एरवी वाचलेले लेख/कविता वगैरे त्या त्या लेखक/कवींच्या तोंडून ऐकताना एक वेगळीच मजा येते आणि ती ह्या संमेलनात मला प्रत्यक्ष अनुभवता आली.पुढच्या वर्षी ह्यापेक्षाही मोठ्या संख्येने लोक भाग घेतील अशी अपेक्षा व्यक्त करून हे छोटेखानी मनोगत संपवतो.
ह्या सभेत मी वाचलेला लेख आणि सादर केलेली कविता

Wednesday, June 24, 2009

शब्दबंध २००९ - वृत्तांत

गेल्या वर्षी शब्दबंध हा उपक्रम सुरू झाला. ब्लॉग लिहिणाऱ्या आणि वाचणाऱ्या लोकांचे इ-स्नेहसंमेलन असा ह्या कार्यक्रमाचा उद्देश होता. ह्या वर्षी तोच उद्देश पुढे ठेवून दुसरे शब्दबंध साजरे झाले. शनिवार दि. ६ जून २००९ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी आठ वाजता शब्दबंधचे पहिले सत्र सुरू झाले आणि रविवार दि. ७ जून रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी आठ वाजता चौथे सत्र संपले. वेगवेगळ्या वेळी चार सत्र ठेवून भारतात आणि भारताबाहेर राहणाऱ्या अधिकाधिक सभासदांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. जवळ जवळ पन्नास च्या आसपास लोकांनी सर्व सत्रात भाग घेऊन उपक्रम यशस्वी केला. ह्या उपक्रमाचे हे थोडक्यात केलेले सिंहावलोकन.


सत्र पहिले - (जपान, ऑस्ट्रेलिया, भारताच्या पूर्वेकडील देश आणि भारत) वेळ - ६ जून २००९, सकाळी ८ ते ११

सहभागी सदस्य -

अभिजित राजवाडे (सूत्रसंचालक), सई मुंडले, नरेंद्र गोळे, आशा जोगळेकर, दीपक कुलकर्णी, क्रांती सडेकर, निलेश गद्रे, प्राजक्ता पटवर्धन, जयश्री अंबासकर, हिमांशू डबीर, विश्वास मुंडले, प्रशांत मनोहर, प्रमोद देव, संध्या जोशी, तुषार जोशी, शैलजा रेगे, आदित्य खेर, सारिका परळकर, हरीप्रसाद.

वृत्तांत -

शब्दबंध-२००८ मध्ये सहभागी झालेल्यांपैकी सई मुंडले यांनी आपल्या सुश्राव्य गाण्याने या सत्राची सुंदर सुरुवात केली. त्यांनी शब्दबंध-२००९ ची पार्श्वभूमी विशद केली. अभिजित यांचा या सत्राचे सूत्रधार म्हणून परिचय करून दिला आणि सत्राची सूत्रे त्यांचे सुपूर्त केली. मग अभिजित यांनी आपल्या ’कला’ या कवितेचे अभिवाचन केले. त्यानंतर नरेंद्र गोळे यांनी आपली स्फूर्तीदेवीची आरती ही कविता सादर केली. त्यानंतर त्यांनी ’ए माझे संजीवनी’ हा ’ए मेरी जुहराजबी’ या गीताचा अनुवाद सादर केला. आशा जोगळेकर यांनी आपली ’आयुष्य’ ही कविता वाचली. त्यानंतर मग दीपक यांनी त्यांची “एक प्रवास कधीही न संपणारा” ही कथा वाचली. मग संगीतावर चर्चा वळली. तेव्हा क्रांती सडेकर यांनी ’पार्वती वेची बिल्वदले’ हे सुंदर गीतच सादर केले. अभिजित यांनी मग नरेंद्र गोळे यांना त्यांच्या ’महानदीचे मुख’ या लेखाचे वाचन करण्याकरता सूत्रे सोपवली. त्यानंतर सई यांनी ’भारती’ ही आपली मोलकरणीवरली कथा वाचून दाखवली. मग आशाताईंनी त्यांची ’प्रवास’ ही कविता वाचली. त्यानंतर अभिजित यांनी आपली कविता ’कोलाज’ चे वाचन केले. मग नरेंद्र गोळे यांनी त्यांची ’ऊर्जा’ ही कविता वाचली. मग नरेंद्र गोळे यांनी ’संसार माझा’ ही कविता सादर केली. यानंतर सई यांनी ’असलेलं नसलेलं’ हा भावपूर्ण लेख सादर केला. सगळेच. सई यांनी ’लट उलझी’ गाऊन सादर केले. सरतेशेवटी नरेंद्र गोळे यांनी ’भारतमाता’ हे आपले कल्पनाचित्रण वाचले. मग “भारत माता की जय”असा जयघोष झाला आणि सभा समाप्त झाली.

सत्र दुसरे - ( भारत ) वेळ - ६ जून २००९, सकाळी ११.३० ते दुपारी ३.३०

सहभागी सदस्य -

जयश्री अंबासकर (सूत्रसंचालक), प्रशांत मनोहर, शैलजा रेगे, तुषार जोशी, आदित्य जोशी, मयूर भागवत, सई मुंडले, क्रांती सडेकर, निलेश गद्रे, सोनल देशपांडे, शमा लेले, दीपक कुलकर्णी, अनिकेत वैद्य, प्रीती छत्रे, दीपिका जोशी, प्रमोद देव, नरेंद्र गोळे, प्राजक्ता पटवर्धन

वृत्तांत -


ह्या सत्राची सुरवात प्रशांत मनोहरच्या एका अचानक मूक झालेल्या मैफिलीची कैफियत मांडणाऱ्या कवितेने झाली. शैलजा रेगेने "के सरा सरा" हा आपला लेख वाचला. तुषार जोशीने एक गोड कविता त्याच्या खास ढंगात सादर केली. ऍडी जोशीने ब्लॉग का लिहावा इथपासून तर ब्लॉग मध्ये काय लिहावं, तो कसा लोकप्रिय करावा इथपर्यंत सगळे सल्ले देणाऱ्या विनोदी लेखाचं वाचन केलं. जयश्री अंबासकर यांनी त्यांची "गुलाबी चांदणे" ही कविता सादर केली. त्यानंतर शैलजानं "विराणी" सादर केली. जयश्री अंबासकर यांनी मग "दाटून कंठ येतो" हा लेख सादर केला. प्रशांत ने "नितांत सुंदर वनराई" ही कविता सादर केली. मयूर भागवत याने जपान ते कोल्हापूर ह्या त्याच्या प्रवासाचं वर्णन ऐकवलं "यात्रा" ह्या लेखातून. दुसरं सत्र संपलं ते क्रांती सडेकर यांच्या खास शब्दबंधसाठी लिहिलेल्या कवितेने

सत्र तिसरे - (भारत, युरोप, पूर्व व मध्य अमेरिका) वेळ - ६ जून २००९, संध्याकाळी ६. ३० ते १०. ३०

सहभागी सदस्य -

प्राजक्ता पटवर्धन (सूत्रसंचालक), गौरी बार्गी, क्रांती सडेकर, हिमांशू डबीर, राहुल पाटणकर, निखिल कुलकर्णी, संगीता गोडबोले, संग्राम भोसले, प्रशांत मनोहर, शैलजा रेगे, निलेश गद्रे, प्रमोद देव, सारिका परळकर, नरेंद्र गोळे

वृत्तांत -

सुरुवातीला क्रांती सडेकरच्या "राधिका" या कवितेचं अभिवाचन झालं. यानंतर गौरी बर्गी हिने 'क्रिस्टालनाख्तच्या निमित्ताने' ह्या लेखाचे अभिवाचन केले. मग हिमांशू डबीर याने एका वाल्याची नवी गोष्ट हा त्याचा लेख वाचला. राहुल पाटणकर याने "आवाहन " ही कविता वाचली. निखिल कुलकर्णी याने 'दिव्य दिव्य कणांचे ' ही कविता वाचली. मग संगीता गोडबोले हिने 'मंजूसाठी मुलगा पाहा" हा तिचा लेख वाचला. प्राजक्ता पटवर्धन हिने "सुवर्ण प्रभा" ही तिची गजल वाचली. प्रमोद देव यांनी "बेंगलोरच्या आठवणी " हा लेख वाचला. संग्राम भोसले याने " लौट के तू आ रे शर्त लगाले " हे त्याचे मनोगत वाचले. सर्वांच्या वाचनाची एक फेरी पूर्ण झाली होती. सगळे उत्स्फूर्तपणे दाद देत होते. चर्चा होतच होत्या. एकूण सत्रांत रंग चढू लागला होता. दुसऱ्या फेरीत हिमांशू डबीर याने "स्वप्नांची मौने" ही कविता सादर केली. यानंतर निखिलने "मी बळी तो बळी" ही कविता सादर केली. मग प्राजक्ता पटवर्धन हिने "ठेवणीतले आवाज' या लेखाचं अभिवाचन केलं. संग्राम भोसले याने "कहाणी साठा उत्तराची" हा लेख वाचला. नंतर राहुल याने त्याची "सावली" ही कविता वाचली. यानंतर क्रांतीने तिची "अंत" ही कविता सादर केली. देव काकांनी मग "कृतार्थ" ही कविता वाचली. याशिवायही एकातून एक विषय निघत अनेक कविता, त्यांची बनलेली गाणी, लेख, यांचेही वाचन झाले.


सत्र चौथे - (पश्चिम अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियाला ) वेळ - ७ जून २००९, सकाळी ४ ते ८

सहभागी सदस्य -

निलेश गद्रे (सूत्रसंचालक), चक्रपाणी चिटणीस, प्रभाकर फडणीस, प्रशांत मनोहर, प्राजक्ता पटवर्धन, नंदन होडवडेकर, शैलजा रेगे, क्रांती सडेकर, नरेंद्र गोळे, दीपक कुलकर्णी, प्राजक्ता दामले, तेजस्विनी लेले, श्रीराम पेंडसे.

वृत्तांत -

सत्राच्या सुरवातीला, मराठी पाऊल पडते पुढे हे गाणे वाजवण्यात आले. त्यानंतर सूत्रसंचालक निलेश गद्रे ह्याने थोडक्यात शब्दबंधच्या संकल्पनेबद्दल सांगितले. सर्व सभासदांनी मग आपापली ओळख करून दिली आणि थोडक्या शब्दात ब्लॉगिंगबद्दल त्यांना काय काय वाटते ते सांगितले. त्यानंतर फडणीस काकांच्या पुस्तक परीक्षणाने अभिवाचनाची सुरुवात झाली. चक्रपाणीचे "जेव्हा तुझ्या बुटांना" हे बूटमहात्म्य अतिशय रंगतदार झाले. त्यानंतर नंदनने लिहिलेले सखाराम गटण्याचे आत्मचरित्रदेखील श्रवणीय झाले. निलेशने केलेले मेलबर्नचे वर्णन श्रोत्यांना सहल घडवून आले. ह्यानंतर प्राजक्ता पटवर्धनने तेजस्विनी आणि प्राजक्ता दामले ह्यांचे व्हॅलेंटाइन डे आणि परदेशातली पाडव्याची वेगळीच ओवाळणी ह्यावरचे अनुभव वाचून दाखवले. प्राजक्ता दामलेच्या उलटी अमेरिका ह्या कवितेच्या वाचनाने अभिवाचन सत्राचा शेवट झाला. नंतर ब्लॉगिंगमधील कमेंटसचे महत्त्व ह्या विषयावर चर्चा झाली. तसेच शब्दबंधला अधिक मोठं करण्याबाबत आणि मराठी वाचकांच्या समोर मराठी ब्लॉग्जमधील साहित्य अधिकाधिक आणणं ह्या विषयांवर चर्चा झाली. समारोपाच्या आधी क्रांती सडेकर यांनी शब्दबंध वरील आपली कविता सादर केली. श्रीराम पेंडसे ह्यांनीही आपली एक कविता सादर केली. त्यानंतर प्रशांतने शब्दबंध बद्दलचे आपले मनोगत व्यक्त केले आणि अखेरीस निलेशने ह्या वर्षीच्या शब्दबंधचे सूप वाजल्याचे घोषित केले.

शब्दबंधसाठी ज्या सर्वांनी आपला अमुल्य वेळ दिला आणि खारीचा का होईना वाटा उचलला त्या सर्वांचे आभार. अनावधानाने कुणाचा उल्लेख करायचा राहून गेला असल्यास मोठ्या मनाने त्यांनी क्षमा करावी ही विनंती.

Friday, May 15, 2009

शब्दबंध २००९ - सत्रांचं वेळापत्रक व सदस्यांची यादी




"शब्दबंध" ही मराठी ब्लॉगकारांची ब्लॉग अभिवाचनाची ई-सभा भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवार दि. ६ जून रोजी सकाळी ८:०० वाजता सुरू होणार असून ७ जून २००९ रोजी सकाळी ८:०० वाजेपर्यंत चालेल. सत्रांचं वेळापत्रक व सहभागी सदस्यांची नावं खालीलप्रमाणे:



भारत, शनिवार दि. ६ जून २००९

सत्र क्र. १ – भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ८:०० ते सकाळी ११:००

सहभागी सदस्य:
१. अभिजित राजवाडे - मालकंस
२. सई मुंडले - थोडे शङ्ख नी शिम्पले
३. दीपक कुलकर्णी - असंच काहीतरी
४. आदित्य खेर - kher.org::Blog
५. आशा जोगळेकर - झुळूक
६. संदीप चित्रे - अटकमटक
७. नरेंद्र गोळे - नरेंद्र गोळे

सत्र क्र. २ – भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ११:३० ते दुपारी ३:३०

सहभागी सदस्य:
१. जयश्री अंबासकर - माझी मी - अशी मी, गूढ माझ्या मनीचे
२. शैलजा - संवाद
३. ऍडी जोशी - आदित्याय नमः
४. प्रशांत मनोहर - लेखणीतली शाई
५. दीपिका जोशी - मीच माझ्या शब्दात
६. तुषार जोशी - येता जाता
७. मयूर भागवत - वाटलं तसं



सत्र क्र. ३ – भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ६:३० ते रात्री १०:००

सहभागी सदस्य:
१. प्राजक्ता पटवर्धन - प्राजु
२. राहुल पाटणकर - कवितांच्या संगतीत
३. संगीता गोडबोले - कसंकाय
४. गौरी बार्गी - झाले मोकळे आकाश
५. क्रांती साडेकर - अग्निसखा
६. हिमांशु डबीर - मनापासून मनापर्यंत
७. संग्राम भोसले - Express ...
८. प्रमोद देव - पूर्वानुभव, त्यांच्या कविता माझे गाणे
९. निखिल कुलकर्णी -मराठी खर्डा

भारत, रविवार दि. ७ जून २००९

सत्र क्र. ४ (अंतिम) भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ४:०० ते सकाळी ८:००

सहभागी सदस्य:
१. निलेश गद्रे - कोहम
२. नंदन होडावदेकर - मराठी साहित्य (Marathi Literature)
३. चक्रपाणि चिटणीस - मनातलं सगळं, खूप काही थोडक्यात, माझ्या अवतीभवतीची फुलपाखरं
४. विशाखा - नभाचा किनारा
५. तेजस्विनी लेले - जास्वंदाची फुलं
६. प्रभाकर फडणीस - महाभारत - काही नवीन विचार

धन्यवाद.

-शब्दबंध

Friday, February 13, 2009

शब्दबंध २००९ - उद्घोषणा



सप्रेम नमस्कार.

"शब्दबंध" ही मराठी ब्लॉगकारांची ई-सभा ६/७ जून २००९ रोजी आयोजित करण्याचा विचार आहे. मराठी ब्लॉगांमध्ये लघुनिबंध, कथा, प्रवासवर्णने, कविता, विडंबन, व्यक्तिचित्र, पाककृती, इत्यादि वैविध्यपूर्ण लेखनाद्वारे ब्लॉगकार अनेक वर्षांपासून मनोरंजन, ज्ञानदान तसेच समाजप्रबोधन करत आलेले आहेत. आपल्या ब्लॉगांमधल्या निवडक पोस्टांचं अभिवाचन करणे व ब्लॉगजगतातल्या आपल्या बांधवांशी मनमोकळ्या गप्पा मारणे हा या ई-सभेचा उद्देश आहे. मराठीमध्ये १००% स्वतःचं लेखन असलेला किमान एक ब्लॉग असलेल्या कुठल्याही ब्लॉगकाराला यात सहभागी होता येईल. या ई-सभेत अधिकाधिक ब्लॉगकारांना सामील करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी सर्वांकडून सहकार्य व ज्यांना शक्य असेल त्यांच्याकडून मदत अपेक्षित आहे.

ब्लॉगकारांच्या प्रतिसादाचा अंदाज आल्यावर एखाद्या शनिवार/रविवारची तारीख निश्चित करता येईल.

जगभर चालणार्‍या या ई-सभेचं स्वरूप साधारणपणे असं असेल -
जपान-ऑस्ट्रेलियापासून ही सभा सुरू होईल. सत्रांची सूत्र क्रमाक्रमाने पश्चिमेकडे हस्तांतरित होऊन भारत-आफ़्रिका-युरोप-अमेरिका या क्रमाने अभिवाचनाचं सत्र सुरू राहील.

देशांतल्या/देशसमूहांतल्या/सत्रांतल्या सहभागी ब्लॉगकारांच्या संख्येनुसार सत्राच्या वेळा व सत्र भरवण्याचं माध्यम ठरवावं लागेल.
स्काईप (www.skype.com)च्या मेसेंजरवर एका वेळी २५ सदस्य सभेमध्ये सहभागी होऊ शकतात. समांतर सत्रे ठेवायची असल्यास स्काईपचा विचार करता येईल, पण त्यापेक्षा अधिक चांगलं माध्यम असल्यास जास्त सोयीस्कर असेल. डिमडिम (www.dimdim.com) द्वारे एकावेळी १०० सदस्य सहभागी होऊ शकतात. अर्थात, याबद्दल चाचणी घेणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त अमेरिकेत व काही देशांमध्ये निःशुल्क टेलिकॉन्फ़रन्सिंगची सोय आहे. या माध्यमांपैकी काहींचा आपल्याला निश्चित उपयोग होऊ शकतो. अर्थात, आणखी माध्यमं उपलब्ध असल्यास त्याची माहिती अवश्य द्या. अधिकाधिक लोकांना सहभागी होता आलं, तर आपल्या सत्राप्रमाणेच इतर सत्रांतल्या सदस्यांचं अभिवाचन ऐकण्याचा आस्वादही सर्वांना घेता येईल. या सत्रांच्या सूत्रसंचालन करण्याची तुमची तयारी असेल तर अवश्य कळवा.

या ई-सभेत सहभागी होण्यासाठी इच्छुक ब्लॉगबांधवांनी shabdabandha@googlegroups.com या गुगलग्रुपमध्ये प्रवेश घ्यावा अशी विनंती. त्यासाठी shabdabandha@gmail.com येथे ईमेल पाठवावा. ईमेलमध्ये आपलं नांव, शहर/राज्य/देश तसेच आपल्या मराठी ब्लॉगचं शीर्षक व दुवा अवश्य द्या.

ई-सभेच्या आयोजनासाठी मदत करू इच्छित असल्यास त्याबद्दलही लिहा.

सभेची आखणी व नियोजन करण्याच्या दृष्टीने कृपया आपल्या सहभागाबद्दल ३० एप्रिल २००९ पर्यंत कळवा.

धन्यवाद.
-शब्दबंध