Thursday, June 25, 2009

शब्दबंध २००९ - व्यक्त होती ब्लॉगकार

"शब्दबंध २००९"ला मराठी ब्लॉगकारांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.

शब्दबंधची यंदाची सभा यशस्वी होण्यामध्ये शब्दबंधींचा जसा वाटा आहे, तसंच या ई-सभेची उद्घोषणा प्रकाशित करण्यास मराठी ब्लॉगविश्व, मिसळपाव व मनोगत या संकेतस्थळांची खूप मदत झाली. या सर्व संकेतस्थळांच्या व्यवस्थापकांचे मनापासून आभार. तसेच, ई-सभेत ऑडियो-कॉन्फ़रन्सिंगचं माध्यम उपलब्ध करुन दिल्याबद्दल स्काईपचे तसेच ब्लॉगलेखनासाठी व ई-पत्रव्यवहारासाठी माध्यमे उपलब्ध करुन देणार्‍या
गुगल व वर्डप्रेस आदिंचेही मनापासून आभार. अनावधानाने कुणाचं नाव घेण्याचं राहून गेलं असल्यास त्याबद्दल क्षमस्व.

ब्लॉग-अभिवाचन, चर्चा आणि गप्पांच्या सहाय्याने चार सत्रांमध्ये शब्दबंध साकारणार्‍या शब्दबंधींचे अनुभव त्यांच्याच शब्दांत -


क्रांती साडेकर -

असा आगळा स्नेह जसा की कमलतंतुचा बंध असावा
अक्षय, शाश्वत नात्याला या प्राजक्ताचा गंध असावा

नकळत अलगद गुंतुन जावे, जसा फुलात सुगंध असावा
स्मरणातुनही सुख बरसावे, दर्शनात आनंद असावा

कधी भेटता अंतरातला भाव असा स्वच्छंद असावा,
श्रावणातल्या हिरव्या रानी भरुन जसा मृदगंध असावा

जगावेगळे अमूर्त नाते, जगावेगळा छंद असावा,
अवीट गोडीने भरलेला स्नेहाचा मकरंद असावा


माझा हा एक मस्त अनुभव होता! आधीचे काही दिवस तयारीत, आदल्या दिवशी तर घरच्या लग्नात हळदीच्या जेवणादिवशी जशी सगळी मंडळी रात्र संपली तरी गप्पा मारत बसतात, तसंच वाटत होतं. आणि नंतरचे दोन दिवस तर मेजवानीच मेजवानी! सईचा बिहाग, पूरिया धनाश्री, पूरिया कल्याण, सुंदर सुंदर लेख, कविता, नुसती धमाल! दुपारच्या सत्रात जयुताई, आशाताई, सगळे दिग्गज कलाकार होते, पण स्काइप थोडं रुसलं होतं, आमचा सतत तळ्यात मळ्यात असा खेळ सुरू होता, पण पुन्हा संध्याकाळी सगळं काही मस्त सुरू झालं. प्राजुचे "ठेवणीतले आवाज", प्रशांत, देवकाका, गोळे काका, दीपक, संग्राम, राघव, संगीता, एकसे बढकर एक कलाकार! भल्या पहाटे निलेश, नंदन, चक्रपाणी, प्रशांत, शैलजा, प्राजु, आणि पुन्हा धमाल! एंडी, अभिजित, गौरी, हिमांशु, सगळ्यांनीच मस्त मजा आणली! कुणाची नावं निसटली असतील, तर सॊरी! एकंदरीत धमाल आली. काय लिहावं सुचत नाहीय! सगळ्यांना मनापासून धन्यवाद! आणि शब्दबंधच्या प्रत्येक नव्या उपक्रमाला शुभेच्छा!

हरिप्रसाद (छोटा डॉन) -
ह्यावेळी प्रथमच "शब्दबंध" हा कार्यक्रम ऐकण्याचा व भाग्याने दुसर्‍या सत्रात एका लघुवाचनाच्या रुपाने सामिल होण्याचा योग आला. फारच प्रसन्न आणि उत्तम कार्यक्रम झाला असे मी म्हणेन.

हा एक नवाच अनुभव होता माझ्यासाठी व तो फारच भावला असे म्हणतो ...

पुढच्या वेळी जास्त सक्रिय सहभाग घेण्याचा प्रयत्न करेन, ह्यावेळी अगदीच ऑ क्लॉक रुपरेषा कळाल्याने जास्त काही करता आले नाही याचेच वाईट वाटते. असो, "श्रोता" हा अनुभवही नसे थोडका ...
बाकी बराच कार्यक्रमाचा भाग हा लाईट जाणे व नेट बंद पडणे, बॅचलर लाईफच्या विकांताची वैयक्तीक कामे, स्काईपचा मधेच उडालेला सपोर्ट, इतर दैनदिन समस्या ह्या मुळे मिस्स झाला ह्याचे वाईट वाटते, पुढच्या वेळी आधीच प्लान करुन ठेवेन आणि संपुर्ण सक्रिय सहभाग घेईल असे आनंदाने व उत्साहाने सांगतो ....

ह्यावेळी जे घडले ते नसे थोडके ...

सर्व आयोजकांचे, सक्रिय सहभाग घेणार्‍या कलाकारांचे व मराठी साहित्यावर प्रेम करणार्‍या जनांचे आभार मानावे वाटतात, फारच सुंदर संकल्पना होती ह्या "शब्दबंधची" ....

आपल्या सर्वांचे अनेक आभार व पुढीच सत्रासाठी आमच्या मनापासुन शुभेच्छा ...


शैलजा रेगे -
शब्दबंधच्या चारही सत्रांना मला उपस्थित राहता आलं. भारतीय वेळेनुसारचं पहाटे ४ चं सत्र मात्र शेवटी शेवटी थोडसं हुकलंच! त्याबद्दल वाईट वाटलं. असो.

मीही ह्या उपक्रमात पहिल्यांदाच सामील झाले होते, आणि खरोखर एक अतिशय मस्त अनुभव मिळाला. केवळ शब्दबंधचाच दिवस नव्हे तर, त्या आधी स्काईपच्या चाचण्या घेताना एकमेकांशी केलेल्या गप्पा, चर्चा, अनौपचारीक गुणदर्शनाचे कार्यक्रम, म्हटलेली गाणी, निव्वळ टीपी सारं काही खूप ग्रेट!

सर्व संयोजकांचे आणि भाग घेणार्‍यांचे आभार! :)


मयूर भागवत -
१) लय भारी कल्पना.
२) स्वतः अतिशय व्यस्त असुनही स्काइप कॉलच्या चाचण्या करून मुख्य कार्यक्रमाच्यासाठीची पुर्वतयारी करणे.
३) माझ्यासारख्या "अत्यंत" उशिरा प्रतिसाद देणार्या ब्लोग्गर्सकड़े माहिती इ. साठी पाठपुरावा.

↑↑↑ हे सगळ फार कमी वेळात आणि यशस्वीपणे पार पाडणार्या नियोजक, आणि तितकेच निवेदक यांचे आभार आणि अभिनंदन!
खरंच सगळ्यान्ना धन्यवाद.
लवकरच पुन्हा सर्वांना भेटायची वाट पहातो आहे. तर मित्रांनो, तोपर्यंत छान काहीतरी लिहीत रहा. आम्ही वाचतोच..प्रमोद देव -
आंतरजालावर स्वत:ची जालनिशी लिहीणारे काही तरूण/तरूणी एकत्र आले आणि झाला एका इ-संमेलनाचा जन्म! त्याला नाव देण्यात आले ’शब्दबंध!’ प्रशांत मनोहर,नंदन होडावडेकर आणि अजून काहीजण ह्यात सामील झाले. वर्ष होते २००८. ह्यावर्षी शब्दबंधचे पहिले इ-संमेलन झाले. भाग घेणार्‍या प्रत्येक सदस्याने आपल्या जालनिशीवरील एखाद-दुसर्‍या लेखाचे/कवितेचे अभिवाचन करायचे ही ती संकल्पना. पहिल्या वर्षी हा प्रयोग लहान प्रमाणात राबवला गेला.
ह्यावर्षी म्हणजे दिनांक ६/७जून २००९ ला हेच संमेलन खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे खूप जास्त जणांच्या सहभागाने यशस्वी झाले. ह्यावर्षी शब्दबंधचे ६० च्या वर सभासद होते. पण प्रत्यक्ष सहभाग २९ सभासदांनीच घेतला. अर्थात पहिल्या संमेलनाच्या तुलनेत ह्यावर्षी अडीचपट जास्त उपस्थिती होती. त्यामुळे हे यश निश्चितच सुखावणारे आहे.
शब्दबंधसारख्या इ-संमेलनासाठी स्काईप हे माध्यम वापरले गेले. स्काईप हा देखिल इतर संवादकांसारखाच(मेसेंजर)एक संवादक आहे ज्यात एकाचवेळी जास्त लोकांना सामावून घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याला इ-सभेचं स्वरूप प्राप्त होऊ शकतं. ह्यावेळी स्काईपचा उपयोग करताना बर्‍याच अडचणी आल्या. तसे बहुतेकजण हे माध्यम पहिल्यांदाच वापरत होते त्यामुळे त्यात असणार्‍या सोयी/अडचणी काही अपवाद वगळता बहुतेकांना नीटशा माहीत नव्हत्या. ह्यासाठी शब्दबंधच्या संमेलनाआधी स्काईपची चांचणी घेण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता. पण कार्यबाहुल्यामुळे म्हणा अथवा काही वैयक्तिक अडीअडचणींमुळे म्हणा त्याला खूपच कमी सभासदांकडून प्रतिसाद मिळाला.
ह्या इ-संमेलनाच्या दृष्टीने विचार केल्यास आलेल्या प्रत्यक्ष अडचणी अशा होत्या.
१)एकावेळी जास्त सभासद एकत्र आल्यावर होणारा गोंधळ...एकजण बोलत असताना इतरांनी शांत राहणे अपेक्षित असते.पण ओसंडून जाणार्‍या उत्साहाच्या भरात ही गोष्ट चटकन लक्षात येत नाही. अर्थात त्यावर उपाय होताच. प्रत्येक सत्राच्या सूत्रसंचालकाने अनुमती देईपर्यंत सर्वांनी आपापले माईक बंद(म्यूट) ठेवणे आणि ह्या पद्धतीने प्रत्येक सत्रात शिस्त राखण्याचा प्रयत्न बर्‍याच प्रमाणात यशस्वी झाला असे म्हणता येईल.
२)प्रत्येक सभासदाच्या जालजोडणीची बॅंडविड्थ वेगळी असल्यामुळे बर्‍याच वेळा संभाषण तुटक तुटक ऐकू येणे.एकाच वेळी जास्त खिडक्या उघडल्यामुळे देखिल बर्‍याचदा बॅंडविड्थ कमी पडत असते. अशा वेळी सभासदाचे सभेतून आपोआप बाहेर फेकले जाणे होत असते. अशावेळी यजमानाने(जो ह्या सभेत इतरांना आमंत्रित करत असतो...ही व्यक्ती सूत्रसंचालक असू/नसू शकते)लक्ष ठेवून त्या सभासदाला पुन्हा आत घेणे वगैरे गोष्टी सातत्याने करायच्या असतात.
३)स्काईपचे व्हर्जन वेगवेगळे असणे की ज्यामुळेही एकमेकांशी संवाद साधण्यात काही अडचणी येत होत्या. स्काईपवर देवनागरीतून लेखी संवाद साधण्यातही काही सभासदांना अडचण जाणवत होती...ज्यावर अजूनही तोडगा सापडलेला नाहीये.

वरील सर्व अडचणींशी सामना करत शब्दबंधचे इ-संमेलन ४ सत्रात पार पडले. प्रत्येक सत्रात अभिवाचक आणि श्रोते मिळून सरासरी १५ जण होते. हे संमेलन अतिशय रंगतदार झाले. एरवी वाचलेले लेख/कविता वगैरे त्या त्या लेखक/कवींच्या तोंडून ऐकताना एक वेगळीच मजा येते आणि ती ह्या संमेलनात मला प्रत्यक्ष अनुभवता आली.पुढच्या वर्षी ह्यापेक्षाही मोठ्या संख्येने लोक भाग घेतील अशी अपेक्षा व्यक्त करून हे छोटेखानी मनोगत संपवतो.
ह्या सभेत मी वाचलेला लेख आणि सादर केलेली कविता

1 comment:

Mrs. Asha Joglekar said...

क्रांती, मस्त आहे कविता । शब्द बंधातलं सारं काहीं आलं त्यांत.